फोलोवर्स

Thursday, 22 October 2020

व्हाईट हॅट गोंधळ आणि गोंधळातले पालक

 



"हे सगळे कोण आहेत?"

"हे वेगवेगळ्या देशातून बिजनेसमॅन आलेत...आमच्या चिंटूने एक ऍप बनवलंय त्यामध्ये इन्व्हेस्ट करायला हे आले आहेत."

सध्या ही ऍड टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि त्याने बऱ्याच पालकांना संभ्रमात टाकले आहे.  आपण आपल्या मुलाला या सगळ्यामध्ये गुंतवायला हवं का असा प्रश्न घेऊन बरेच माझे मित्र किंवा पालक मला फोन करतात.  हे उगाच सगळं थोतांड आहे आणि फक्त मार्केटिंग गिमिक आहे असंही बऱ्याच जणांचं मत आहे.  सोशल मीडियावर वेगवेगळे नकारात्मक रिविव्ह मी याबद्दल वाचले आहेत.  बदल म्हटलं कि माणूस सुरुवातीला विरोध करतोच.  काही पालकांनी जरी हे स्वीकारलं असलं तरी त्यांचा उत्साह वेगळ्या पद्धतीचा जाणवतो.  काही पालकांना हे पैसे कमावण्याचं साधन वाटतं, काहीजणांना हे सक्तीचं वाटतं, तर काहीजण स्टेट्स सिम्बॉलसारखं मुलाचा कोर्स पूर्ण झाल्यावर ते सर्टिफिकेट सोशल मीडियावर अपलोड करतात.  हा पूर्ण प्रकार आपल्या भारतातल्या बऱ्याच पालकांसाठी नवीन असल्यामुळे ही नव्याने आलेली जाहिरात पालकांना अगदी वेगळी वाटली.  पण या जाहिरातीमध्ये कितीही अतिशयोक्ती असली तरीही या पद्धतीचे शिकवण ही येणाऱ्या काळाची गरज बनणार आहे. 

खरं सांगायचं झालं तर प्रोग्रामिंगचे रिअल लाईफमध्ये पैसे कमवण्याव्यतिरिक्त बरेच फायदे आहेत.  हेच फायदे मुले लहान असताना जर प्रोग्रामिंग शिकली तर नक्कीच त्यांना होऊ शकतील, जसे कि, 

१. मुलांचे विचार संगणकाच्या पद्धतीने सुरु होतात.  मोठंमोठे प्रॉब्लेम्स छोट्या पार्टमध्ये विभागून त्यावर उपाय शोधण्याची सवय मुलांना लागते

२. प्रोग्रामिंग बऱ्यापैकी तर्कांवर (लॉजिक) वर केली जाते.  एन्ड रिजल्ट डोक्यात ठेवून स्टेप बाय स्टेप एखादी गोष्ट प्रोग्रामिंग मध्ये घडवली जाते त्याचा फायदा मुलाची लॉजिकल थिंकिंग वाढण्यावर होऊ शकतो.  

३.  यामध्ये बऱ्याच वेळेला क्रिएटिव्हिटी सुद्धा वापरली जाते आणि त्याचा फायदा मुलांना होतो

४. एखादी गोष्ट प्रोग्रामिंग मध्ये बनवल्यावर युजर ती वापरताना काही समस्या (एरर) येऊ शकतात. एरर अव्हॉइड करण्यासाठी मुलांना बरीच काळजी घ्यावी लागते यात त्यांची विचारक्षमता वाढू शकते. 

५. एखादी गोष्ट चालत नसेल तर का चालत नाही हे शोधण्यासाठी चिकाटी लागते

६. गणितामध्ये जसं स्टेप बाय स्टेप गणित सोडवल्यावर आपण उत्तरापर्यंत पोहचतो तसंच प्रोग्रामिंगमध्येही आपल्याला रिजल्ट मिळतो. गणितासारखे काही एक्सप्रेशन्स यामध्ये वापरावे लागतात त्यामुळे गणिताचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन मुलांना पाहायला मिळतं. 

७. चाकोरीबाहेरचा विचार करायला मुलं नक्कीच प्रवृत्त होतात. 

असे एक ना अनेक बरेच फायदे प्रोग्रामिंग शिकल्यावर मुलांना होतात.   मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्यामुळे माझ्या नरेश नावाच्या मित्राने अमेरिकेतून मला मे-जून दरम्यान कॉल केला होता आणि भारतामध्ये प्रोग्रामिंग रिलेटेड काहीतरी मुलांसाठी चालू कर असं त्याने मला सुचवलं.  अमेरिकेत अगदी लहानपणापासूनच मुलांना या गोष्टींची सवय लावली जाते त्यामुळे अगदी १०-१२ वर्षाची मुले होईपर्यंत अगदी चॅम्पियन होऊन जातात असं त्याचं म्हणणं होतं.  जग सध्या ज्या वेगाने धावत आहे, तंत्रज्ञान ज्या पद्धतीने बदलते आहे, काही वर्षानंतर एखादं फिक्स करिअर असा प्रकार राहणार नाही.  २००० साली पुढे जाऊन माझा मुलगा फेसबुक किंवा गूगलमध्ये काम करेल असं कोणत्याही पालकांना वाटलं नसेल.  तसंच यापुढे आपला मुलगा पुढे जाऊन काय करिअर करेल हा प्रश्न पालकांच्या मनात कायम राहीलच.  प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वावर पूर्णतः पुढच्या काही वर्षात आपल्याला पाहायला मिळणारच आहे.  त्यामुळे काही ना काही प्रमाणात मुलांना अशा गोष्टींसाठी तयार करणं हे पालकांसाठी चॅलेंज होऊ शकेल.  पण त्यासोबतच मुलांचं बालपण हिरावून न घेता त्यांचा तंत्रज्ञानाकडचा कल लक्षात घेऊन काही प्रमाणात त्यांना या गोष्टींचं शिकवण देणं पुढच्या काही वर्षात गरजेचं होणार आहे.  जाहिरात करताना बढेजाव करणे हे जाहिरातदारांचं कामच आहे.  पण जाहिरातींना बळी न जाता आपल्या मुलाचा कल आणि क्षमता ओळखून त्याला अशा नव्या गोष्टींसाठी प्रवृत्त करणे ही आजच्या काळाची गरज आहे. 

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
तुमचा तंत्रज्ञान मित्र

No comments:

Post a Comment