फोलोवर्स

Wednesday, 7 August 2019

संशय घ्यायला शिका !



संशय घ्यायला शिका !

तुमच्या बँकेचं एटीएम कार्ड ब्लॉक झालंय.  पुन्हा चालू करण्यासाठी अकाउंट नंबर द्या", असं म्हणत तुमची ओटीपी किंवा इतर सिक्रेट माहिती समोरचा व्यक्ती फोनवर विचारू लागला तर संशय घ्यायला शिका.  असे खोटे कॉल करून बऱ्याच व्यक्तींच्या बँक अकाउंट मधून पैसे लंपास झालेले आहेत.

"अनोळखी व्यक्तीची फेसबुक किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि ती स्वीकारल्यावर समोरची व्यक्ती तुमच्या कळत नकळतपणे जास्तच लगट करायला लागली तर संशय घ्यायला शिका.  समोर बसलेला व्यक्ती भामटा असू शकतो.  या निष्काळजीपणामुळे बरेच सायबर क्राईमचे गुन्हे घडलेले आहेत.

"तुम्हाला 1 लाख पौंडसची लॉटरी लागली आहे  आणि ते पैसे मिळवण्यासाठी एका विशिष्ट नंबरला फोन करा किंवा मेसेजला रिप्लाय करा", असा ईमेल किंवा मेसेज आला की संशय घ्यायला शिका.  तुम्ही इतर लोकांसारखे फिशिंग अटॅकचे बळी होऊ शकता.

"तुम्हाला आयफोन नऊशे नव्यान्नव रुपयाला मिळतोय किंवा सरकारकडून तुम्हाला फुकट पैसे मिळणार पण तो फायदा मिळवण्यासाठी तुम्ही मेसेज दहा लोकांना शेअर करा", अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला आला तर संशय घ्यायला शिका.  तुमची महत्वाची माहिती तुम्ही चुकीच्या माणसाच्या हाती देताय आणि समाजात अफवा पसरवण्यास मदतही करताय.

तुमचा पाल्य हल्ली शांत शांत असतो.  घाबरलेल्या अवस्थेत दिसतो.  कुणाशी पूर्वीसारखा वागत नाही आणि सतत कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपसमोर सोशल मीडियावर ऑनलाईन असतो तर संशय घ्यायला शिका.  तो सायबर स्टॉकिंगचा बळी झालेला असू शकतो. 

टेक्नॉलॉजी जितकं तुमचं आयुष्य सुकर करू शकते तितकाच टेक्नॉलॉजी वापरताना निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. म्हणूनच आजच्या जगात नात्यांवर नाही तर तुमच्या बाबतीत घडणाऱ्या वरील घटनांवर संशय घ्यायला शिका व कायम सावध राहा.

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
तुमचा तंत्रज्ञान मित्र
९२२१२५०६५६

No comments:

Post a Comment