रविवारी श्री कोचिंग इन्स्टिट्यूटच्या "जागो पालक" या उपक्रमात "सोशल मीडिया व मोबाईल" याविषयावर चर्चा झाली. आठवी नववीच्या मुलांना व त्यांच्या पालकांना तिथे आमंत्रित केलं होत. काही दिवसापूर्वीच संदीप दादाने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती कि "चौदा वर्षाखालील मुलामुलींना मोबाईल द्यावा कि नाही?" आणि त्यावर बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया त्याला कमेंटच्या स्वरूपात मिळाल्या होत्या. जेव्हा त्याने मला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं आणि या विषयावर चर्चा होईल असं सांगितलं तेव्हा एका गंभीर आणि सध्याची गरज असणाऱ्या विषयावर चर्चा होईल याचा आनंद वाटला. डॉ. सुशांत नागरेकर व मी मिळून पालकांचे काही प्रश्न व त्याची दिलेली उत्तरे सारांशरूपात खालीलप्रमाणे आहेत.
१. १४ वर्षाखालील मुलांना मोबाईल देणे योग्य आहे का?
- नाही. आजच्या पालकांना मुलांबद्दल चिंता असेल तर तुम्ही स्मार्टफोन ऐवजी कीपॅड असणारे व त्यात कोणते फीचर्स नसणारे मोबाईल त्यांना घेऊन द्या. मोबाईलचा वापर हा फक्त संपर्क सुरळीत व्हावा यासाठी होईल. ते मोबाईलच्या आहारी जाणार नाहीत.
- ज्या पालकांना भीती असते कि आमची मुले यामुळे मागे राहतील किंवा दुनिया तंत्रज्ञानाबरोबर जाईल व माझ्या मुलाला काही जमणार नाही अशा पालकांनी त्यांचा स्वतःचा स्मार्टफोन संध्याकाळी ठराविक वेळ आपल्या मुलाला नव्या गोष्टी शिकण्यासाठी द्यावा.
- मुलांना स्मार्टफोन घेण्याऐवजी घरात एक कॉम्प्युटर (लॅपटॉप नाही) घ्यावा व त्याला इंटरनेट कनेक्शन जोडावे. तो कॉम्प्युटर असा ठेवावा कि जेणेकरून घरातल्या कोणत्याही जागेवरून सहज दिसेल. यामुळे मुलं चुकीच्या गोष्टी करण्यास धजावणार नाहीत.
- लहान मुलांनी शांत राहावे किंवा जास्त त्रास देऊ नये म्हणून पालक हल्ली लहान मुलांच्या हाती सहज मोबाईल देऊ करतात. एक-दीड वर्षाचा मुलगा सहजरित्या मोबाईल हाताळतो ही अभिमान बाळगण्याची गोष्ट नसून काळजी करण्याची असू शकते. या मुलांना लहानपणापासून गेम किंवा मोबाईल सतत पाहण्याची सवय लावली तर ती मुलं चिडचिडी किंवा हट्टी होऊ शकतात.
- इंटरनेट आता बऱ्याच स्टेशन्सवर फ्री मध्ये उपलब्ध आहे किंवा विकत घेणेही तितकं महाग नाही. अशावेळी हातात स्मार्टफोन असताना वाढत्या वयात असणाऱ्या मुलांचा कल सहसा ब्लु फिल्म्स बघण्याकडे किंवा विघातक गोष्टी बघण्याकडे जास्त असतो.
पालकांनी गोष्टी सहज उपलब्ध करून देऊन स्वतःची जबाबदारी झटकणं चुकीचं आहे. आपल्या पाल्याची प्रायव्हसी ब्रेक न करता तो/ती काय करतेय यावर लक्ष असणं महत्वाचं.
२. सततच्या मोबाईल वापराने आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात?
- तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्र टाइम्समध्ये एक आर्टिकल आल होतं त्यात काही धक्कयादायक माहिती होती. सतत तंत्रज्ञानाचा वापर करून जे मानसिक रोग उदभवले आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचा राज्य म्हणून पूर्ण भारतात दुसरा नंबर लागतो. जवळजवळ सव्वा लाख लोक सध्या मानसोपचारतज्ज्ञाकडे यासाठी उपचार घेत आहेत. मुंबईचा पूर्ण भारतात शहर म्हणून पहिला नंबर लागतो.
- अवेळी भूक लागणे किंवा भूक मरणे, निद्रानाश, चिडचिड होणे अशा प्रकारचे त्रासही जाणवू शकतात.
- मेंटल हेल्थ सेंटरने एक सर्वे केला होता ज्यात त्यांनी सांगितलं होत कि एक व्यक्ती दिवसभरात ११२ वेळा मोबाईल चेक करते. याला "ब्रोकन फोकस सिंड्रोम" असे म्हणतात. याचा अर्थ माणसाची एकाग्रता कमी होत चालली आहे.
- सतत मोबाईल चाळल्याने (सहसा तो रात्री काळोखात झोपताना चाळला जातो) डोळ्यांवर परिणाम होतो.
३. सोशल मीडियाचा नकारात्मक काय प्रभाव होतो?
- सोशल मीडियाचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे तुम्ही करोडो लोकांपर्यंत सहज पोहचता. पण त्यात तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये असणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या ओळखीची आहे का? हे आपण पाहायला हवं.
- समोरच्या व्यक्तीचा पडताळा करणे सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज शक्य नाही त्यामुळे समोरच्या व्यक्तीने टाकलेल्या फोटोजवरून त्या व्यक्तीची विश्वासार्हता ठरवू नका. त्या व्यक्तीवर चटकन विश्वास ठेवू नका. अशीच बरीचशी प्रेम प्रकरण तयार होऊन कित्येक आत्महत्येच्या व खुनाच्या केसेस दाखल केल्या आहेत.
- आपली प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर यायला पाहिजे हा अट्टाहास नको. तुम्ही सध्या काय करता याचा अंदाज बांधणे किंवा तुमचे सगळे लोकेशन्स ट्रॅक करणे सहज शक्य आहे.
- महिलांच्या / मुलींच्या फोटोजच क्लोनिंग करून त्याचा दुरुपयोग करण्याच्या बऱ्याच केसेस यापूर्वी रजिस्टर झाल्या आहेत. बऱ्याच वेळेला सायबर बुलिंग (ऑनलाईन रॅगिंग) करून समोरच्या व्यक्तीचा मानसिक छळ करणे हा प्रकार वाढत आहे.
- लहान मुलांचे फोटोज नग्न अवस्थेत टाकणे, किंवा त्यांच्या फोटोजची अतिशयोक्ती करणे हेसुद्धा त्या मुलांसाठी घातक ठरू शकते. हल्ली चाईल्ड पोर्नोग्राफी हा प्रकार सुद्धा खूप वाढायला लागला आहे.
- इंटरनेटवर टाकलेली कोणतीही गोष्ट धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखी आहे. तुम्ही ती एकदा पोस्ट केली मग ती डिलीट करूनही ती पूर्णपणे निघून जात असेल याबाबतीत शंकाच आहे. तेव्हा कोणतीही गोष्ट पोस्ट करण्याअगोदर ती टाकणे खरोखर गरजेचे आहे का हा प्रश्न स्वतःला नक्कीच विचारा.
४. मुलांनी या गोष्टीचा सकारात्मक वापर करावा यासाठी केलं पाहिजे ?
- मुलांनी समजूतदार झाल्यावर मतदान करावं यासाठी जशी आपल्याकडे मतदान करण्यासाठी वयाची अट आहे तसेच स्वतःचा मोबाईल वापरायला देण्यासाठीसुद्धा एक वयाची अट असायला हवी. तोपर्यंत मुलांनी शिकावं यासाठी पालक स्वतःचा मोबाईल मुलांना ठराविक वेळ ठरवून देऊ शकतात.
- पालकांनी मुलांना हव्या त्या गोष्टी देऊन आपली जबाबदारी पूर्ण झाली असं न समजता मुलांच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवायला हवं. एका सर्वेक्षणात अस समोर आलं आहे की मुले / मुली आपले प्रॉब्लेम्स फेसबुकवरच्या अनोळखी व्यक्तीबरोबर शेअर करण्याला प्राधान्य देतात. त्या गोष्टी पालकांशी शेअर करणे त्यांना योग्य वाटत नाही किंवा ते त्यासाठी कम्फर्टेबल नसतात. यासाठी पालकांनी त्यांच्याशी प्रत्येक वेळी मोकळा संवाद साधायला हवा. घरातल्या छोट्या मोठ्या डिस्कशनमध्ये मुलांना सहभागी करून घ्यावं जेणेकरून आपण घरातले महत्वाचे घटक आहोत हे मुलांना जाणवायला हवं. पालकांना कोणतीही गोष्ट सांगताना मुलांनी कचरता कामा नये एवढा विश्वास पालकांनी मुलांना द्यावा. मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याकडे पालकांचा कल असावा.
- सोशल मीडियावर मित्र / मैत्रीण ऍड करताना सहसा तो ओळखीचा असेल असाच मित्र / मैत्रीण ऍड करायला हवेत. अनोळखी व्यक्तींना फ्रेंडलिस्ट मध्ये ठेवू नये.
शेवटी तंत्रज्ञान ही फक्त एक युटिलिटी आहे. त्याच्या वापर कसा करावा हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे. जस चाकूने भाजी कापता येते व त्याने खुनही होतो तसंच तंत्रज्ञानाचही आहे. आपण त्याचा जसा वापर करू तसा त्याचा प्रभाव आहे. सोशल मीडिया वाईट आहे असं नाही पण त्याचा साकारात्ममक वापर कसा करावा याची माहिती असणे गरजेचे आहे जेणेकरून त्याच व्यसनात रूपांतर होणार नाही.
For English Information, Click here
http://techiteasierenglish.blogspot.in/2017/10/Whatsapp-Undo-Send.html
धन्यवाद,http://techiteasierenglish.blogspot.in/2017/10/Whatsapp-Undo-Send.html
सुबोध अनंत मेस्त्री
तुमचा तंत्रज्ञान मित्र
9221250656
#techiteasier #doyouknow #swarajyainfotech #ileadmylife #jeevanrang
